योगेश कुऱ्हाडे

बुद्ध मूलभूत पद्धतीने समजावा,अभ्यासावा अशी खुप वर्षांपासूनची इच्छा होती. बुद्धाविषयीची मिथकं, त्याचं सामाजिक-राजकीय महत्व माहित होतं. आणि त्यामुळे ओढा अधिकच होता. AMBPE ह्या कोर्सच्या कॉर्डीनेटर पैकी एक असलेली माझी मैत्रीण चारू ने मला ह्या कोर्स विषयी सांगितलं. केवळ सांगून ती थांबली नाही, तिने मला परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहनही दिलं. हा काळ पँडेमिकचा होता. सगळीकडेच तेव्हा माणसाच्या मानसशास्त्रीय गरजांविषयी गंभीर चर्चा चालू होती.या अगोदर मी विवेकनिष्ठ मानसशास्त्राचा एक छोटासा कोर्स केला होता. ती फ्रेमवर्क उपयुक्त होती तरीही आपल्या ‘स्व’भावाबद्दल काहीतरी मूलभूत समजत नाहीय असं वाटत राहायचं. MBPE कोर्सने आत्म(की अनात्म?)विद्येच्या प्राचीन विचारप्रवाहाशी नाळ जोडून दिली. दुःख म्हणजे काय आणि दुःख निरोध कसा करता येईल ह्या मूलभूत प्रश्नातुन बुद्ध दर्शनाचा उलगडा करत, त्याआधारावर विकसित झालेल्या मानसशास्त्रीय व नीतिशास्त्रीय विचारव्यूहाशी ओळख करून दिली. हे दर्शन बोजड न करता, रोजच्या जगण्यासंदर्भात भाष्य करत खेळीमेळीने समजावलं, शिकवलं गेलं. आशा पिल्ले यांच्यासारखा शिक्षक मी दुर्मिळच अनुभवला आहे. त्यांची शिकवण्यातली सहजता संसर्गजन्य आहे. त्यांनी समजावून सांगितलेल्या संज्ञा, विचारसूत्र व त्याअनुषंगाने वर्गात होणाऱ्या चर्चा ह्या आपल्याला बौद्धकालीन संघाचा भास करवतात. आशा त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत चालण्यात विश्वास ठेवतात. हे समान चालणं हि श्रमण परंपरेचा भाग वाटतं.त्यांनी सहज सांगितलेली वाक्य, प्रसंग सूत्रासारखे दिशादर्शक म्हणून सोबत राहिले आहेत. इलेन आणि चारू ह्या या समकालीन संघाला एकत्र ठेवणाऱ्या सन्मित्र आहेत. त्यासाठी दोघी अथक प्रयत्न करत असतात. त्यांचा उत्साह, सातत्यपूर्ण उपस्थिती, मैत्रीपूर्ण संवाद हे सगळ्या विद्यार्थ्यांना कोर्स सोबत जोडून ठेवतात. मला ह्या कोर्स मध्ये जे मिळालं ते माझ्या व्यक्तित्वाचा, रोजच्या विचारप्रक्रियेचा भाग झालं आहे. बुद्ध दर्शनाच्या अभ्यासातुन एका उत्तम संघाशी जोडलो गेलो ह्याचा खूप आनंद वाटतो.

योगेश कुऱ्हाडे

Scroll to Top